पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यतील देशी – विदेशी दारू, बीअर, वाइन विक्रीचे नवे परवाने, परवाना दुरुस्ती, हस्तांतरण आणि नूतनीकरण प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तास आधीपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि त्यानंतर मतमोजणीचा दिवस हे ४ दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे त्या दिवशी मद्यविक्रीस मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात बारामती मतदारसंघात ५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपपर्यंत, तर पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १३ मे रोजी मतदान संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. त्यानंतर मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी संपूर्ण दिवसही मद्य विक्री बंद राहणार आहे.