नवीन इलेक्ट्रॉनिक बसेसचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

0

“राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- 2025” चे उद्घाटन, प्रवासी अन् परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना केली व्यक्त

ठाणे : आज ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना २०२५ चे व नवीन इलेक्ट्रॉनिक बसेसचे लोकार्पण परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नितीन मैंद, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, उपमहाव्यवस्थापक मांडके, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, लवकरच एस.टी च्या ताफ्यामध्ये २ हजार ६४० लालपरी नव्याने दाखल होत आहेत. या नव्या वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक कानाकोपाऱ्यात नव्या लालपरी दिमाखात धावताना दिसतील. याबरोबरच भाडेतत्वावरील ५ हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत. एवढेच नव्हे तर २ हजार ५०० नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव एस.टी. ने शासनाकडे पाठविला असून त्याचा देखील पाठपुरावा करुन पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या बसेस एस.टी.च्या ताफ्यात दाखल होतील असे प्रयत्न केले जातील. ते म्हणाले, आज १७ बसेसच्या सेवेचे उद्घाटन झाले आहेत. परंतु ज्या १५० बसेस येणार त्यातील मी सांगितले की, ठाणे शहरांमध्ये ४० आणि मीरा भाईंदरमध्ये १० अशा एकूण ५० बसेस सुरुवातीच्या काळात मंजूर करुन घेतल्या आहेत. आणि उर्वरित बसेस या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत.

जे मार्ग बंद पडलेले आहे ते मार्ग आधी सुरु करावेत. बसेस वेळेवर कशा धावतील याची तांत्रिक गोष्टी सांभाळून काळजी घ्यावी, असे आवाहन करून परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, प्रवाशांना सुखसुविधा देत असताना चालक व वाहकाच्याही सुखसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एस.टी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा देणे आपले परम कर्तव्य आहे. रस्ते वाहतुकीची समस्या आपल्यापुढे एक आव्हान आहे. त्यातून काही प्रमाणात रस्ते अपघात होतात. ते होवू नयेत यासाठी मात्र रस्ता सुरक्षाविषयक निकष व नियम तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सरनाईक म्हणाले की, वेगमर्यादा केवळ सीसीटीव्हीत न पाहता किमान दोन किलोमीटर अंतर पाहून हा मर्यादित वेग प्रति तास ८० किमी पेक्षा जास्त असू नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वळणे व तत्सम बाबींविषयी ठिकठिकाणी सूचनाफलक लावावेत. वाहतूकीचे नियम लोकांकडून योग्य प्रकारे पाळले गेले तर अपघातांची संख्या फार कमी होईल, असा विश्वास मला वाटतो.

यावेळी त्यांनी बसस्थानकावरील शौचालय व प्रतिक्षागृहाची पाहणी केली असता वाहक व चालक यांना आराम करण्याची, गरम व थंड पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षागृह चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मला भरपूर काही निर्णय घ्यायचे आहेत. चालक व वाहक यांच्यासंदर्भात माध्यमांतून काही प्रतिक्रिया दिसून येतात, तेव्हा अतिशय वाईटही वाटते. आपण लोकप्रतिनिधी म्हणून चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांनाही सुविधा द्यायला हव्यात, या मताचा मी आहे. माझ्यावर ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून या जबाबदारीचे भान ठेवून या राज्य परिवहन महामंडळाच्या परिवाराचे अजून चांगले करण्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करीन. माझ्या एस.टी कर्मंचाऱ्याला सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि त्यातले पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागासाठीही शंभर दिवसाचा कार्यक्रम आखून दिला आहे. या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच काही चांगले निर्णय घेतले जाणार आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य सुविधेअंतर्गत मोफत आरोग्य उपचारांसाठी प्रयत्न करु या. प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा, कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार, बोनस, एस.टी. सेवा तोटयातून बाहेर काढणे, ही परिवहन मंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे.

भविष्यात “प्रवाशांची सुरक्षितता” हे आपले कर्तव्य करताना त्यांना सांभाळणे, प्रवासी हे आपले देव, हाच आपला विठ्ठल, असे मानून प्रवाशांना उत्तम सेवा देत आपण पुढे वाटचाल करु या, असेही ते शेवटी म्हणाले. लुईसवाडी येथील एक महिला तिची पर्स बसमध्ये विसरली होती. परंतु त्या बसचे चालक विक्रम जाधव यांनी त्या महिलेचा शोध घेतला आणि त्यांना त्यांची पर्स परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसेच संबधित पर्स सापडलेली महिला अंजली गांगल यांनीही वैयक्तिक पाच हजार रुपयांचे बक्षीस संबंधित बसचालक विक्रम जाधव यांना दिले.

या कार्यक्रमाप्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर म्हणाले की, चालक व वाहक यांनी स्वतःची तसेच प्रवाशांची सुर‍क्षा महत्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपली बस अन् बसस्थानक स्वच्छ ठेवणे. आपली सेवा अपघातमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी यांत्रिक अडचणीची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी चालक व वाहक यांच्यासाठी पालकदिन सुरु केला आहे. चालक व वाहक यांना त्यांच्या मानसिक अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले की, वाहतूकीचे सर्व नियम पाळले पाहिजे.आपण सर्वांनी सिट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान न करणे, अपघात होवू न देणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी नितीन मैद यांनी ०१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा-२०२५ बाबत माहिती विषद करुन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech