मुंबई – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती आज दुपारी अचानक बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलिक यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत.
नवाब मलिक यांना ईडीने २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. त्यांना मूत्रपिंड संबंधित तसेच इतर शारिरिक त्रास आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितल्यामुळे न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता.
प्रकृती ठीक नसल्यामुळे ते कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसत नव्हते. शनिवारी दुपारी अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना कुर्ला येथे रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक यांनी दिली.