बीड : केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश दिले होते. नंतर बारगळ यांची बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडच्या नवीन पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कांवत यांची धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून पोलीस दलात ख्याती आहे. नवीन कांवत हे २०१७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरात उपायुक्त असलेले नवीन कांवत हे बीडचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता ते करणार असून यातून तपासाला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कांवत हे मुळचे राजस्थानचे आहेत. त्यांनी आयआयटी रूरकीमधून इलेक्ट्रीकट इंजिनियरींग केली आहे. त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. नवनीत कांवत यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण मुरादाबादमध्ये आणि त्यानंतर सहावी ते बारावीचे शिक्षण सैनिक स्कुल चित्तोडगढ इथे झालं आहे. नवनीत यांनी दहावीत टॉप केलं आहे. बारावीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी.टेक केलं. नवनीत यांनी आयआयटीमधून पदवी मिळवल्यानंतर सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून खाजगी कंपनीत नोकरी केली. त्या दरम्यान नवनीत कांवत यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सूरू केला. स्पर्धा परिक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे नवनीत कांवत अभ्यास करून २०१७ साली आयपीएस बनले.