– परिषदेत आधुनिक डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पर्यावरण व आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न
मुंबई – मुंबईतील होमी भाभा राज्य विद्यापीठात नुकतेच सलग ३ दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . या परिषदेमध्ये सुमारे १५० संशोधक, उद्योगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सहभाग घेतला . या परिषदेत आधुनिक डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगसारख्या वैज्ञानिक पद्धतींच्या सहाय्याने पर्यावरण आणि आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तीन दिवशीय परिषदेद्वारे उद्योग आणि शिक्षणसंस्था यांच्यातील संवादासाठी एक आधुनिक व्यासपीठ निर्माण झाले. परिषदेत डेटा सायन्स व गणितासाठी धोरणे व अभ्यासक्रम तयार करण्याबाबत चर्चा झाली, तसेच उद्योगांसाठी उपयुक्त संशोधन संस्कृती विकसित करण्यावर भर देण्यात आला. हब अँड स्पोक मॉडेलद्वारे ज्ञान व कौशल्य विकासासाठी उत्कृष्ट वातावरण तयार करण्याचे उद्दिष्ट या परिषदेने साध्य केले.
पहिल्या दिवशी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि गणित यावरील प्री-कॉन्फरन्स ट्युटोरियल्स आयोजित करण्यात आले. त्यानंतर डेटा सायन्स व आधुनिक गणिताच्या सहाय्याने औद्योगिक गणित आणि प्रकल्पांवर सत्रे पार पडली. दुसऱ्या दिवशी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आणि सिग्नल प्रोसेसिंगवरील मुख्य व्याख्यान झाले. डेटा सायन्स व गणिताच्या उपयोगासाठी धोरणे आणि उपाययोजनांवर संक्षिप्त चर्चासत्र पार पडले. परिषदेमध्ये पर्यावरणविषयक उपाययोजनांवरील अनेक आमंत्रित मान्यवरांची व्याख्याने झाली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनाद्वारे पर्यावरण समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी या परिषदेला मोठा प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवशी चर्चासत्रे आणि उद्योगतज्ज्ञांच्या सत्रांद्वारे विविध उपक्रम राबवले गेले.
परिषदेमध्ये मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, जिथे सहभागी आणि प्राध्यापकांनी डेटा सायन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या परिषदेची ही वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. यासोबतच तांत्रिक विषयांवर विद्यार्थ्यांसाठी एक महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. या परिषदेत उद्योग, शैक्षणिक आणि संशोधन ‘भागीदारांशी ७ विविध सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी दिली.