मुंबई : बांगलादेशमधील लोकप्रिय आणि राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजना रहमान यांचे निधन झाले आहे. शनिवारी पहाटे १ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अभिनेत्रीच्या अचानक निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे. अभिनेत्री अंजना रहमान या गेल्या तीन आठवड्यांपासून आजारी होत्या. बांगलादेशातील ढाका याठिकाणी असणाऱ्या बंगाबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटी (बीएसएमएमयू) हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर अभिनेत्रीची आयुष्याशी झुंज अपयशी ठरली. अंजना यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास ३०० हून अधिक चित्रपटात काम केले होते. ‘परिणीता’मध्ये अंजना यांनी लोलिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना बांगलादेशच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंजनाने बांगलादेशी चित्रपटांसोबतच श्रीलंकन, पाकिस्तानी, नेपाळी आणि तुर्की चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने मिथुन चक्रवर्तीसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला आधी सौम्य ताप आला होता आणि नंतर त्यांना रक्ताचा संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने 1 जानेवारी रोजी अभिनेत्रीला बीएसएमएमयू रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती जास्त बिघडल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र या उपचारांचा काही फायदा झाला नाही आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.