नागपूर : राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रिपदाची प्रतीक्षा असून राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांना उत्सुकता लागलेल्या पालकमंत्री पदाची यादी अद्याप जाहीर झाली नसल्याने सत्ताधारी पक्षातील अनेकांनी धास्ती घेतली असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रिपदाची प्रतीक्षा असून, अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. आता १५ ते १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्रिपद विषयाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (१३ जानेवारी) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठवड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे जाहीर होतील, असा दावा केला होता. मात्र, अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
‘महायुतीतील पालकमंत्र्यांचा विषय मार्गी लागलेला आहे. १५ ते १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्रिपद विषयाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत.कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २६ जानेवारीला झेंडावंदन कोणी करायचे यावर तोडगा निघालेला असेल,’’
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, तसेच भाजपकडून सदस्यता नोंदणीवर भर देण्यात येत आहे. दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांत ही संख्या गाठण्यात यश येईल. त्यानंतर बूथप्रमुख, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल त्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांबरोबर जाऊन काम करू. भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीत पुढे जाऊ. ’’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.