ठाणे – जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी/ प्लंबर, मेकॅनिक/फिटर व इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जल जीवन मिशन अतुल पारसकर यांनी केल आहे. याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी. या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत तीन नल जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. तीन पदांसाठी प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे ९ उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायती अंतर्गत माहिती ॲपद्वारे भरायची आहे. ग्रामपंचायतींमार्फत सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करण्यात येणार असून निवड झालेल्या नल जल मित्र याना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच: १.प्लंबर/गवंडी ,२.मोटर मेकनिक/फिटर, ३.इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. कौशल्य असलेल्या उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती व शाश्वततेसाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता पात्र उमेदवारांनी ग्रामपंचायत सोबत संपर्क साधावा.-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे