मुंबई – आपण द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम अधिक मुले जन्माला घालतात, अशी भीती पसरवण्याचा प्रयत्न का करत आहात? मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लीम सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही संकोच वाटत नाही, असे म्हणत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला.
ओवेसी म्हणाले हा माझा डेटा नाही, तर मोदी सरकारचा डेटा आहे. मात्र, नरेंद्र मोदी द्वेष पसरवत आहेत. मुस्लिमांचा जन्मदर सर्वांधिक आहे, असल्याचे सांगत बहुसंख्य समाजाची दिशाभूल करायची त्यांची इच्छा आहे. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात राजस्थानमधील बांसवाडा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, ते माता-भगिनींचे सोने आणि मंगळसूत्रही घेऊन टाकतील आणि त्यांची संपत्ती, जे लोक अधिक मुले जन्माला घालतात त्यांना वाटून टाकतील. पंतप्रधान मोदी यांनी मुस्लीम असे नावही घेतले होते.
मोदी म्हणाले होते, मनमोहन सिंग सरकारने देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले, एका देशाचे पंतप्रधान १५ टक्के लोकांना घुसखोर म्हणत आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. यानंतर, निवडणूक पॅनेलने भाजप अध्यक्षांना नोटीस बजावून, त्यांच्या स्टार प्रचारकांकडून कशा प्रकारचे भाषण अपेक्षित आहे हे सांगण्यास सांगितले होते.