# हिंदू बांधवांचे रक्षण करा
# आंतरराष्ट्रीय पातळीवरून पंतप्रधानांनी दबाव आणावा
ठाणे – बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात आज (दि.११) मुंब्रा येथील दारूल फलाह मशिदीसमोर मुस्लीम बांधवांनी निषेध आंदोलन केले. बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिस सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांग्लादेशात अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेनंतर हिंसा उफाळून आली. कट्टरपंथीयांनी हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अय्याज, शाहरूख सय्यद, कादीर मेमन, सहार युनीस शेख यांच्यासह मुंब्रा – कौसा येथील मौलवी, मुस्लीम बांधवांनी निदर्शने केली. यावेळी “हिंदू बांधवांचे रक्षण करा” , असे फलक झळकवित आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, जिथे जिथे मानवतेच्या विरोधात कृत्य होतील; त्याचा निषेध आम्ही मुंब्रावासिय करणारच आहोत. त्यासाठीच आज आम्ही येथे उपस्थित आहोत. बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयाेगाने याची दखल घ्यावी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरून उचलून आमच्या हिंदू बांधवांचे रक्षण करावे, अशी मागणी यावेळी मौलाना अब्दुल वहाब यांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्यने तरूण, तरूणी, ज्येष्ठ नागरिक, महिला सहभागी झाले होते.