जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज दिसत आहेत. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली. मात्र ही वारी त्यांना पावली नाही. शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील भाजपवर नाराज झाले.
पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी जाहीर केले. पण ते प्रत्यक्षात नाराज आहेत. आठ दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली. या बैठकीतदेखील उन्मेष पाटील गैरहजर दिसून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. तिकीट डावलल्याने एकदाही उन्मेष पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिका-यांच्या भेटीगाठी साठी आलेले नाहीत. यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून आली.