पुणे : राज्यातील विमानतळांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बैठक होणार आहे. या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या विषयावरही चर्चा होणार आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोहोळ महात्मा फुले वाड्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मोहोळ म्हणाले, “असा कोणताही वाद नाही. आम्ही निवडणुका एकत्र लढलो. नेत्यांमध्ये समन्वय आहे. कार्यकर्त्यांमध्ये ती समज आहे. त्याविषयी वादही नाही, चर्चाही नाही. जे पक्ष नेतृत्व निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य आहे.’ यावेळी मोहोळ पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, “पुरंदर विमानतळासाठीची जागा यापूर्वीच निश्चित झाली आहे. राज्यातील विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रातील काही अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच एक बैठक होणार आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागले, असे मोहोळ म्हणाले.