“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही” जरांगेच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

0

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांनी, आता खरी मजा येईल हिशेब चुकता करायची आता बघू आरक्षण देतात की, नाही असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही असा टोला लगावला आहे. ते आज, बुधवारी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. जरांगेंच्या या विधानाबद्दल नागपुरात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघांच्याही भूमिकेत कोणतेही अंतर नाही. यापूर्वी जे निर्णय आम्ही घेतले ते तिघांनी मिळून घेतले. यापुढेही जे निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघेजण मिळून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नरत आहेत. यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे परभणी येथे कुणाचेही नाव न घेता म्हणाले की, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संपल्यानंतर मी शेतकऱ्यांचा विषय हातात घेणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे देत नाहीत आणि धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न कसा मार्गी लागत नाही ? तेही मी पाहतो. शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागला पाहिजे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे 2 कोटी पेक्षा जास्त मराठा समाज आतापर्यंत आरक्षणामध्ये गेला. आता येत्या 25 जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार आहे. उपोषण मला किती सहन होईल हे मला माहिती नाही. पण मी माझ्या समाजासाठी मरायलाही तयार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech