मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईतील वरळीनंतर आता माहीम विधानसभा मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण, येथील मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेविरुद्ध महायुतीकडून विधानसभेला उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत माहीम मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून महायुतीचा उमेदवार उभा राहणार की नाही, याबाबत महायुतीकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
माहीम-दादर विधानसभा मतदारसंघात मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्नं सुरू असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाकडून येथील मतदारसंघात महेश सावंत यांना तिकीट देण्यात आलंय. महेश सावंत हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना अमित ठाकरेंविरुद्ध उतरवण्यात आलंय. माहीम मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे अमित ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे, मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर ह्यांनी पडत्या काळात आपली साथ दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर, अमित ठाकरे हे आपल्याच घरातील मुलगा असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटंलय. या चर्चेदरम्यान, आता सदा सरवणकर यांनी थेट वर्षा बंगला गाठला आहे. त्यामुळे, माहीमबाबात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.