नागपूर : नागपुरात सोमवार १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे, त्यापूर्वी महायुती सरकारने मंत्रीमंडळ विस्तार संपन्न झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार पुनरागमन करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. एवढ्या प्रचंड प्रमाणात यश मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले. तर मंत्रिमंडळ विस्तार करायला आणखी १२ दिवस असे मिळून एकूण २४ दिवस लागले. अखेर आज (१५ डिसेंबर) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आणि ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७ तर राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत.