महाविकास आघाडीचे १ सप्टेंबरला मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन….!

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा…..

मुंबई – अनंत नलावडे

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना असून महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या युती सरकार विरोधात महाविकास आघाडी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार असून २ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुक्यातही हे आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार,यांची आज मातोश्रीवर बैठक झाली व या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची हिम्मत या भाजपा युतीच्या नेत्यांची होतेच कशी? भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या एका खासदाराने महाराजांचा जिरे टोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवून महाराजांचा अपमान केला. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठा पुतळा बसवू.मात्र या कमिशनखोर सरकारला अक्कल कधी येणार?, अशा शब्दांत जाब विचारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आज महिला,शाळेतील मुलीही सुरक्षित नाहीत,जनतेत सरकार विरोधात प्रचंड आक्रोश असून घाबरलेले सरकार जनतेचा उठाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही.रश्मी शुक्ला यांना कोणत्या आधारावर पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाळ वाढवून दिला.या पोलीस महासंचालक भाजप व राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचा अजेंडा चालवत असून राज्य सरकारची चुकीची धोरणे व पोलीस प्रशासनाच्या कारभारामुळेच राज्यातील परिस्थिती बिघडली आहे, असाही आरोप पटोले यांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech