मातीशी नाळ जोडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष – संभाजीराजे छत्रपती

0

पिंपरी : परिवर्तन महाशक्तीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ तसेच चिंचवड मतदारसंघाचे उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी पक्षाचे स्टार प्रचारक दीपक केदार आणि अन्य पदाधिकारी ही उपस्थित होते. या सभेला दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. जे आयुष्यात स्वप्न बघतात, ती स्वप्न सत्यात उतरावी म्हणून जीवाचं रान करतात, अश्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे, त्यामुळं सुराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीला साथ द्या, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी पिंपरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.

संभाजीराजे छत्रपती आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार घेऊन स्वराज्य पक्षाने वाटचाल सुरू केलेली आहे. हे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्र दौरा केलेला आहे. आज शंभर वर्षे झाली तरी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आपल्यासमोर उभे आहे. सर्व जातीच्या लोकांना आरक्षण असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला शिक्षणासाठी केलेली मदत असो, राजर्षी शाहू महाराजांनी नेहमीच बहिष्कृत समाजाचे नेतृत्व केले आणि त्यांना बळ दिले. दुर्दैवाने आजही परिस्थिती अशी आहे की पैशांच्या जोरावर प्रस्थापितलोकांची मुजोरी चालू आहे.

हा दोष आपल्यासारख्या विस्थापितांचा आहे. वर्षानुवर्षे आपण प्रस्थापितांना मत देत राहतो. आपण स्वप्ने कधी बघणार? फक्त महापुरुषांची नावे घेऊन राजकारण करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना आपण कधी जागा दाखवणार? सुराज्य आणण्यासाठी, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे वागून काम करण्यासाठी स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती उभी ठाकलेली आहे. त्याला तुम्ही सर्वांनी ताकद द्या, सुसंस्कृत महाराष्ट्र आपलं घडवायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी याठिकाणी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech