रत्नागिरी : पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात पहिला क्रमांक राहील असा प्रयत्न आहे. उद्योगमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सामंत यांचे हेलिकॉप्टरने पाली येथे निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मागील सरकारमध्ये अडीच वर्षे मी उद्योग मंत्री म्हणून उत्तम काम केले, त्याची पोचपावती म्हणजेच पुन्हा उद्योग खाते मिळाले आहे. निवडणुकीत राज्यातील जनतेला उद्योगासंदर्भात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी या पुढील काळात करून, आता प्रत्यक्षात उद्योग उभारणी करून रोजगार निर्मिती करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अडीच वर्षांच्या कालावधीत उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम क्रमांक आणण्यात यश आले होते. उद्योगासंदर्भातील बदललेल्या धोरणांचा उद्योजकांना चांगला फायदा झाला. गडचिरोलीपासून रत्नागिरीच्या टोकापर्यंत नव्या उद्योगांना मंजुरी मिळवून देण्यात यशस्वी झालो.
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर प्रथमच मराठी भाषा मंत्रालय मला देण्यात आले आहे. मराठी भाषेला खूप मोठे महत्त्व आहे. भाषेचा दर्जा अधिक भक्कम करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविले जातील. त्या संदर्भातील एक वर्षाचा आराखडा तयार केला जाणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करणारा विकास या पुढील काळात आपल्याकडून केला जाईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनही त्या खात्याअंतर्गत काम करता येते. साहित्य, नाट्य क्षेत्राशी या विभागाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे साहित्यिकांशी संवाद साधून आवश्यक ते बदल, उपायोजना जनजागृती करून जास्तीत जास्त व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.