मुंबई : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आता रविवारी 15 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये महायुतीच्या सुमारे 35 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष हा शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. तत्पूर्वी 15 डिसेंबर रोजी नागपुरात बहुतेक आमदार पोहचणार आहेत. त्यामुळे हा शपथविधी 15 तारखेला दुपारी 3.30 वाजता नागपुरातील राजभवनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळे नागपुरातही घडमोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे यांचा 19 डिसेंबर रोजीचा पूर्वनिर्धारित कार्यक्रम रद्द झाला आहे. त्याऐवजी राज्यपाल15 ते 17 डिसेंबर दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत.