प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. आगीच्या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा परिसरात उपस्थित होते. छतनाग घाट नागेश्वर घाटच्या सेक्टर २२ मधील आगीच्या घटनेत तंबू जळून खाक झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यात आली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. यावेळी त्यांनी बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनाचा त्यांनी आढावा घेतला. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू भस्मसात झाले होते. सिलेंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली होती.