रत्नागिरी- रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी मोफत रुग्णालय आज सुरू झाले. रत्नागिरी नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत रत्नागिरीत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरिबांना न्याय देणारे हॉस्पिटल असले पाहिजे. त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. या कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे, असे सामंत यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी डॉक्टर व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. परंतु, सामाजिक क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने वलय निर्माण करण्यासाठी मी या क्षेत्रात उतरलो. विकासात्मक कामाच्या डोलाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे ताकद दिली आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली विकासकामे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचे ठाण्यात सुरू झालेले कॅशलेस हॉस्पिटल पाहिले आणि त्याचवेळी रत्नागिरीमध्येही तसे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. इतिहासात याची निश्चितच नोंद होईल. कोविडसारख्या कठीण काळात डॉक्टर आणि नर्स देवदूतासारखे धावून आले. कोविडमध्ये केलेल्या कामामुळे त्यांच्याविषयीचा आदर कायम राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.
शारीरिक परिस्थितीवर मात करुन एखादा अधिकारी कसा सकारात्मक काम करतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुख्याधिकारी तुषार बाबर आहेत. प्रमाणिकपणे शहराच्या विकासासाठी ते काम करत आहेत, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. दिवसनिहाय या हॉस्पिटलसाठी पालकमंत्र्यांनी नियोजन केल्याचे सांगून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासनातर्फे केली जाईल. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ या हॉस्पिटलमधून मोफत दिला जाईल. या रुग्णालयाची जास्त गरज भासू नये, म्हणजेच लोकांचे आरोग्य निरोगी राहावे, असेही ते म्हणाले. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले.