विवाहिताने प्रेयसीसह लिव्ह-इन इस्लाम धर्माला मान्य नाही

0

लखनौ – इस्लाम धर्म मानणारे लोक आणि विशेषतः जे विवाहित असून ज्यांचे जोडीदार हयात आहेत त्यांना लिव्ह – इन रिलेशिपमध्ये राहाता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने दिला. इस्लाम धर्मातील तत्त्वानुसार विवाहित स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांना मान्यता नाही. लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणारे स्री-पुरुष दोघेही जर अविवाहित आणि सज्ञान असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्यांना आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील स्नेहा देवी आणि मोहंमद शादाब खान या लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याने आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. ए आर मसूद आणि न्या. ए. के. श्रीवास्तव यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्या स्नेहा देवी यांनी असे सांगितले होते की, त्या सज्ञान असून स्वेच्छेने मोहंमद शादाब यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. मात्र त्यांच्या आई-वडिलांनी शादाबच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

स्नेहा देवी यांच्या या म्हणण्याची सत्यता पडताळणीसाठी पोलिसांनी केलेल्या तपासात शादाब खान हा विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचे आढळून आले. याची दखल घेत न्यायालयाने स्नेहा देवी यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. तसेच स्नेहा देवी यांना पोलीस संरक्षणात त्यांच्या आई-वडिलांच्या घरी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech