नवी दिल्ली : देशात अनेक रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. काही प्रवाशांचे तिकीट वेटींगवर तर काहींना आरएसी (रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सलेशन) तिकीट मिळते. आरएसी तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जात होते. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे आता या प्रवाशांना सुद्धा कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे.
रेल्वेत आरएसी (रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सलेशन) तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वेने आता आरएसी तिकीट असणाऱ्या प्रवाशांना बेडरोल, बेडशीट, उशी आणि ब्लँकेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा एसी-कोचमधून प्रवास करणाऱ्या आरएसी तिकीट धारकांना मिळणार आहे. यासंदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे.