“आम्ही हिंदूंसोबत आहोत हा संदेश जगभरात जावा” – सुनील आंबेकर

0

नागपूर : बांगलादेशातील हिंदूंनी अत्याचाराला घाबरून पळून जाणार नाही, असा निर्धार केला आहे. त्यापेक्षा आपण त्याला सामोरे जाऊ. ‘जो डर गया वह मर गया’, हे सूत्र तिथल्या हिंदूंना चांगलेच उमगले आहे. बांगलादेशी हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे, असे आवाहन यावेळी आंबेकर यांनी केले. आम्ही बांगलादेशातील पिडीत हिंदू समाजाच्या पाठिशी उभे आहोत हा संदेश बांगलादेश सरकार आणि संपूर्ण जगाला मिळाले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधातील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी नागपुरातील व्हेरायटी चौक परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगरप्रमुख राजेश लोया, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, अमोल ठाकरे, रमेश मंत्री, सविता माटे, डॉ.विश्वास आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आंबेकर म्हणाले की, बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर मुगल काळातील अत्याचाराची दृष्य बघत असल्याचा भास होतो. बांगलादेशातील परिस्थिती पाहून आम्हा सर्वांना दु:ख झाले आहे. पण आपल्याला या अन्यायाचा, अत्याचाराचा राग आला पाहिजे. कारण आपल्या लोकांवर अत्याचार झाला की आपल्याला राग येतो. तेव्हा बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार पाहून संताप यायला हवा असे आंबेकर म्हणाले. आपल्या देशातील काही नेते म्हणतात की झाले-ले विसरून जायला हवे. पण वेळोवेळी घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, हिंदूंच्या हत्याकांडाच्या घटना आपल्याला काहीही विसरु देत नाहीत. आम्ही बांगलादेशला आमचा मित्र मानून मैत्रीपूर्ण वागत होतो. पण तिथे वाढणाऱ्या कट्टरतावादी शक्तींनी आपला खरा चेहरा दाखवून हिंदूंवर अत्याचार सुरू केले.

संपूर्ण सनातन हिंदू धर्म नष्ट करणे हा तिथे सक्रीय असलेल्या शक्तिंचा अजेंडा आहे. बांगलादेशातील हिंदू एकटे नाहीत, भारतीय समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री बांगलादेशशी चर्चा करत आहेत. यातून तोडगा न निघाल्यास इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल. बांगलादेशात अशांतता निर्माण करणाऱ्या जागतिक शक्तींना त्यांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी आम्हाला परावृत्त करावे लागेल. त्यासाठी आपला समाज आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. तसेच अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या पाठीशी जागतिक शक्तींनाही उभे राहावे लागेल असे आंबेकर यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech