मुंबई : सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस राऊतांनी सोशल मीडियावर शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी जी कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ती सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून पाठवली आहे. या नोटिशीत, २६ मे २०२४ रोजी सामनामध्ये बदनामीकारण लेख लिहिल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
वकिलांमार्फत पाठवण्यात आलेल्या या नोटिशीत म्हटले आहे की माझे क्लायंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना या राजकीय पक्षाचे गटनेते देखील आहेत, ते एक आदरणीय सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहेत. जनतेने त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आहे. माझे आशील २४/७ सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय कार्यात गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. इतर राजकीय पक्षांना तसेच तुम्हाला त्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे माझ्या आशिलाची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी तुमच्याकडून खोटा प्रचार केला जात आहे. माझा आशिलांच्या आरोपांनुसार, तुम्ही संबंधित वृत्तपत्राचे मुख्य संपादक असताना त्यात पूर्णपणे खोट्या आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्या आहेत.
२५ मे २०२४ रोजी तुम्ही लिहिलेल्या लेखात काल्पनिक आणि निंदनीय विधाने प्रसिद्ध केली आहेत. या दाव्यानुसार तुम्ही लेखात लिहिले की, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात अमर्याद पैसा खर्च केला असून प्रत्येक मतदारसंघात अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचं वाटप केले आहे. त्याचबरोबर अजित पवारांचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी हे केले आहे असेही यात छापून आले आहे. तुमचे हे आरोप माझ्या आशिलांनी फेटाळून लावले असून ही विधाने केवळ खोटीच नव्हेत तर निंदनीय आहेत. याद्वारे जनतेची दिशाभूल करुन त्यांच्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय तुम्ही तुमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, प्रसिद्धी आणि राजकीय वजन वापरुन ही बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यात आली आहे असेही संजय राऊतांना आलेल्या कायदेशीर नोटीशीत म्हटले आहे.