बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात हे प्रकरण तापलं. त्यानंतर ३१ डिसेंबरला या प्रकरणात वाल्मिक कराड स्वत: पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, देशमुख यांच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेला मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अद्याप पोलीस शोधू शकलेले नाही.त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे अशी प्रसिद्धी पत्रक बीडच्या पोलीस ग्रुप वरती करण्यात आली आहे. शिवाय, पोलिसांनी त्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात फरार होता अशीही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील इतर आरोपी पोलिसांना सापडले मात्र, कृष्णा आंधळेला पोलीस अद्याप शोधू शकलेले नाही.त्यामुळे आता बीड पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित केलं असून आरोपी आंधळेची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना १४ दिवसांच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यानंतर वाल्मिक कराडला मकोकामध्ये याआधी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आज ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची पाटलांनी माहिती दिली. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे. बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.