मुंबई : अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱया आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱया राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम) रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक आहे. के. ई. एम. रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. शताब्दी वर्षानिमित्त रुग्णालयात ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ उभारावे. रुग्णालयात वैद्यकीय संग्रहालय (डॉक्टर म्युझियम) सुरू करावे. रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांची राहण्यासाठी व्यवस्था करावी तसेच झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लवकर सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सुनील शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. श्रीमती संगीता रावत आदी यावेळी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रूग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वार्षिक अहवाल-२०२४ आणि दैनंदिनी-२०२५ तसेच ‘दृष्टी’ या स्मरणिकेचे प्रकाशन आज (दिनांक २२ जानेवारी २०२५) रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱयांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. सेवाधर्माची शपथ घेऊन सर्वजण हे वैद्यकीय क्षेत्रात येतात. के. ई. एम. यंदा याच सेवाधर्माची शतकपूर्ती करीत आहे. कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदरभाव असतो आणि ते आपले आधारवड असतात. त्याचप्रमाणे मुंबई महानगरासह लगतच्या परिसरासाठी हे रुग्णालय एक कुटुंब असून भक्कम आधारवड आहे. वैद्यकीय तसेच सामाजिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही के. ई. एम. रुग्णालयाने धरली आहे. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके स्थापित केली आहे. के. ई. एम. मधील कर्मचाऱ्यांनी अचेतन अवस्थेतील श्रीमती अरुणा शानबाग यांची तब्बल ४१ वर्षे अविरत आणि निस्वार्थ सेवा केली, ही जगातील एकमेवाद्वितीय बाब आहे. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयातून अनेक वैद्यकीय विद्यार्थी घडलेत आणि जगभरात नावलौकिक मिळवत आहेत, असे गौरवोद्गार देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले.
रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचा ऐतिहासिक दाखला देत शिंदे म्हणाले की, भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया के. ई. एम. रुग्णालयात १९६८ मध्ये झाली आणि २०२४ मध्ये येथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. कोविडच्या काळात येथील डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय वायुदलाकडून विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. अवयवदानामध्ये वाखाण्ण्याजोगे कार्य केल्याबद्दल रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी केईएम रुग्णालयात १९८७ मध्ये डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघ्याची शस्त्रक्रिया केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात के. ई. एमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक आहे. संस्थेचे शताब्दी वर्ष हे पुढील पिढ्यांसाठी पायाभरणी ठरेल, असा आशावादही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे पुढे म्हणाले, रुग्णसेवेचे व्रत हाती घेतलेल्या राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रूग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासन आणि प्रशासन कायम तत्पर आहे. शताब्दी वर्षानिमित्त रुग्णालयात ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ ची उभारणी करावी. या रुग्णालयास अनेक दिग्गजांचा सहवास लाभलेला आहे त्यामुळे रुग्णालयात वैद्यकीय संग्रहालय (डॉक्टर म्यूझियम) सुरू करावे. रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी व्यवस्था करावी तसेच झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लवकर लागू करावी, असे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले.