नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक भावनिक आवाहन करत त्यांच्या प्रकृतीची गंभीर स्थिती समोर आणली आहे. लासलगावमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, मला दर ८-१५ दिवसांत सलाईन लावावं लागतं. माझं शरीर आता साथ देत नाही. हाडं दुखतात, शरीर जळतं. पण माझी सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. माझं आयुष्य मराठा समाजासाठी आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. मी किती दिवस तुमच्यात राहील, माहीत नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी समाजाला लढा सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. आरक्षण मिळवण्यासाठी गप्प बसायचं नाही. माझं शरीर कितीही साथ देईनासे हो, मी तुमच्या ताकदीसाठी शेवटपर्यंत लढेन.
जरांगे पाटील यांनी मतदारांना विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्पष्टपणे सांगितलं की, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडायचं त्याला निवडा. मी तुम्हाला कोणतंही बंधन घातलेलं नाही. मतदान तुमचं, मालक तुम्ही. त्यांनी पुढे सांगितलं की, गावागावांत उपोषण न करता सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आंदोलन करायचं. मराठा समाज शांत असतो तोपर्यंत ठीक, पण एकदा तो पेटला की सरकार कोणाचंही असो, ते डोकं बंद पाडतो. जरांगे पाटील यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी समाजाला आवाहन करत म्हटलं की, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये याची मला काळजी आहे.