मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा खुला

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदामार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगलामार्गे वळविण्यात आली होती. मात्र या मार्गावरील एका मार्गिकेचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रातून देण्यात आली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर बोगदा भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने काल (दि. २९ नोव्हेंबर) बंद करण्यात आला होता. आता महामार्ग प्रशासन आणि एल अँड टी प्रशासनाकडून बोगद्यातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे जुन्या मार्गावरील कशेडी बंगला पंचक्रोशीतील नागरिक व प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी वाहने मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. किमान चिपळूण, खेड व महाड आगारातील एसटी बसेस कशेडी बंगला मार्गे सोडण्यात याव्या, अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून केली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवीन मार्गावरून एसटी, ट्रक, टेम्पो, कारसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी बोगदामार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळेसह इंधनाची बचत होऊन प्रवासही सुसाट होत असल्याने सर्वच वाहनचालक या मार्गाने जाणे पसंत करतात. त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech