नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार हे दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या जागावाटपानुसार काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर कन्हैय्या कुमार लढण्याची शक्यता आहे. कन्हैय्या कुमार यांना भाजपाचे दोन वेळा खासदार असलेले अभिनेते मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू आहे.२०१९ मध्ये कन्हैय्या कुमार यांनी डाव्या पक्षांच्या तिकिटावर बेगुसराय मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले होते. राहूल गांधी यांच्या न्याय यात्रेमध्ये कन्हैय्या कुमार हे सतत सोबत होते. काँग्रेसने अद्याप दिल्लीतील नावांची घोषणा केलेली नाही. मात्र, कन्हैय्या कुमार यांचे नाव या आधीच काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.