नागपूर : केवळ मनोरंजन करणे हा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा हेतून नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत बनवणे हा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. नागपूरच्या हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात कलागुणांचा संगम असलेल्या या प्रसिद्ध महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते काजोल यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांनी काजोल यांची आजी प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ आणि पती अजय देवगण यांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व महोत्सवाला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले.
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वाला आज, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी नागपुरात प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हणाले की, केवळ मनोरंजनच नाहीतर जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व परंपरागत मूल्ये कला व लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचावी हा या महोत्सवाचा हेतू आहे. रस्ते, वीज, दळणवळण यासोबतच साहित्यिक व सांस्कृतिक दर्जा वाढल्यानंतरच शहराचा विकास होतो. अनेक कलाकारांच्या उपस्थितीने हा महोत्सव फुलतो व प्रतिष्ठेचा होतो. यंग टॅलेंटला वाव देणारा हा उत्सव जनतेच्या आवड व आनंदाचा ठेवा आहे, असे उद्गार गडकरी यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले.
अभिनयसंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्री काजोलने मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच रसिक सुखावले. काजोल यांची उपस्थिती आणि लाघवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत, अतूट प्रेम आणि सन्मानासाठी त्यांनी नागपूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काजोल यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करताना या महोत्सवामुळे हजारो कलावांताना मंच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. काजोल यांनी हर्षन कावरे या कलाकाराने काढलेली त्यांच्या रांगोळी प्रतिमेचे कौतुक केले आणि फोटो काढून घेतला