देशातील पहिले ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्र न्यायसंस्थेसाठी मानचिन्ह ठरेल -न्यायमूर्ती भूषण गवई

0

ठाणे – देशातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्र ही वास्तू आपल्या महाराष्ट्रात होत आहे, याचा निश्चितच आनंद आहे. ही अकॅडमी समाजात सामाजिक, आर्थिक समानता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल आणि न्यायसंस्थेसाठी मानचिन्ह ठरेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.भूषण गवई यांनी आज येथे केले.

देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या ॲडवोकेट अकॅडमी व संशोधन केंद्राचा मुख्य भूमीपूजन समारंभ नेरूळ,नवी मुंबई मधील डॉ.डी.वाय.पाटील विद्यानगर येथील टाऊन हॉल, सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. प्रसन्न वराळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस गडकरी, न्यायमूर्ती नितीन सांबरे, महाराष्ट्र राज्याचे ॲडवोकेट जनरल डॉ. बीरेंद्र सराफ, गोवा राज्याचे ॲडवोकेट जनरल श्री.देविदास पंगम,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे उपाध्यक्ष ॲड. सुदीप पासबोला, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड.आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विधी व न्याय विभागाचे विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ.राहुल गेठे, विधी व न्याय क्षेत्रातील विविध नामवंत वकील, विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री.भूषण गवई म्हणाले की, कार्यपालिका, विधीपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्था एकमेकांना पूरक, सहाय्यकारी व्यवस्था आहेत. ही व्यवस्था अधिक सक्षम होईल यासाठी न्यायिक क्षेत्रातील सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ॲडवोकेट अकॅडमी व संशोधन केंद्राची वास्तू लवकरच पूर्ण होईल.

शासनाच्या सहकार्यातूनच राज्यात नागपूर,औरंगाबाद आणि मुंबई येथे लॉ युनिव्हर्सिटी साकारल्या जात आहेत. नागपूर येथील लॉ युनिव्हर्सिटी चे काम पूर्ण झाले असून तेथील कॅम्पस जागतिक स्तरावरील कॅम्पस बनले आहे. मुंबई लॉ युनिव्हर्सिटीचेही काम लवकरच सुरू होणार आहे.

या अकॅडमीसाठी जागा देण्याची कार्यवाही अत्यंत जलद गतीने केल्याबद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार मानून ते पुढे म्हणाले की, विविध ठिकाणी बेंचेस ची नव्याने स्थापना हा निर्णय न्यायव्यवस्थेला उपयुक्त ठरणार आहे. मंडणगड सारख्या ग्रामीण भागात न्यायालय स्थापन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यात आला आहे.

ते म्हणाले, या देशातील सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे. न्यायव्यवस्थेने सामाजिक,आर्थिक राजकीय न्याय मान्य केला आहे. त्यादृष्टीने आपण न्याय क्षेत्रात काम करायला हवे. सामाजिक,आर्थिक विषमता दूर करणे, ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

सुदृढ सक्षम समाज घडविण्यासाठी सामाजिकदृष्ट्या वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही अकॅडमी उत्कृष्ट वकील घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार आहे, असे सांगून न्यायमूर्ती श्री.गवई यांनी या अकॅडमीतून सामाजिक,आर्थिक क्रांती निर्माण करणारे वकील घडावेत, नामवंत वकिलांनी या अकॅडमीत आपले ज्ञानरूपी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, देशातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी महाराष्ट्रात साकारली जात आहे, याचा निश्चितच आनंद आहे. त्याबद्दल महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे मनःपूर्वक अभिनंदन. शासनाने या अकॅडमीसाठी जागा दिली आहे. समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठीही अकॅडमी उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. या अकॅडमीच्या माध्यमातून न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल. चांगले कायदे बनविण्यासाठी या अकॅडमीची निश्चित मदत होईल.

ते म्हणाले, न्यायदानाचे क्षेत्र वेगाने बदलत आहे. या क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. कोविड काळात मा.सुप्रीम कोर्टाच्या पुढाकाराने ऑनलाईन न्यायदानाचे उत्तम कार्य पार पडले. त्यामुळे या क्षेत्रातील पारदर्शकता वृद्धिंगत झाली. नुकतेच उच्च न्यायालयाच्या इमारतीचे भूमीपूजन झाले तसेच आज या ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्राचेही भूमीपूजन संपन्न झाले.डॉ.डी.वाय.पाटील विद्यानगर सारखे शिक्षण संकुल अभ्यासाला प्रेरणा देते, प्रोत्साहन देते. अलीकडच्या काळात Learn…Unlearn.. Relearn शिका..विसरा आणि पुन्हा शिका… ही अभ्यासाची आधुनिक पद्धत सर्वत्र रुजत आहे. या बदलत्या काळात अशा प्रकारची अकॅडमी न्याय क्षेत्रासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या अकॅडमीसाठी शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ॲडवोकेट ॲक्ट सुधारित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी विद्यावेतन देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सांगून या अकॅडमीच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अकॅडमीची जागतिक कीर्ती व्हावी..! -उद्योगमंत्री उदय सामंत

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या अकॅडमीची जागतिक कीर्ती व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, देशातील आणि महाराष्ट्रातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्राची एक चांगली वास्तू आपल्या महाराष्ट्रात तयार होत आहे. हे अतिशय उत्तम काम होत आहे. महाराष्ट्रातील सर्व वकिलांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यायिक व्यवस्था अधिक सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. आपली न्यायिक व्यवस्था सर्वोत्तम आहे. या व्यवस्थेवर कोणीही आक्षेप घेता कामा नये. ग्रामीण भागातही न्यायालये स्थापित होत आहेत. ही बाब अतिशय समाधानकारक आहे. राज्यकर्त्यांसाठीही या अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जावे.

या वास्तूसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून जी जमीन देण्यात आली आहे त्या जमिनीचे मूल्य आहे 32 कोटी रुपये. मात्र न्यायिक व्यवस्थेला सहकार्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. अशा प्रकारच्या देशातील पहिल्या अकॅडमीला जागा देता आली, इतक्या महत्त्वाच्या कामात शासनाचा सहभाग देता आला, याचे मनस्वी समाधान वाटत आहे. या अकॅडमीमधून चांगले वकील घडावेत. आपली न्यायव्यवस्था अधिक सुदृढ, सक्षम व्हावी.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी या ॲडवोकेट अकॅडमी व संशोधन केंद्राच्या वास्तू उभारणीसाठी रू.1 कोटी 21 लाख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी अध्यक्ष ॲड.गजानन चव्हाण यांनी 25 लाख आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून या वास्तूसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई यांनी या अकॅडमीसाठी नवीन वकील, माजी न्यायाधीश, नामवंत वकील मंडळी आपले योगदान नक्कीच देतील,असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाला नवनवीन कायदे बनविण्यासाठी ही अकॅडमी निश्चित सहाय्य करील, शासनास अशा प्रकारचे सहाय्य करण्यासाठी ही अकॅडमी नेहमी तत्पर असेल, असे सांगून शासनानेही या अकॅडमीसोबत नेहमी सहकार्याच्या भूमिकेत राहावे,असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शमिता यांनी केले तर आभार प्रदर्शन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे उपाध्यक्ष ॲड.सुदीप पासबोला यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech