ठाणे- ठाणे रेल्वे स्थानकावरील ६३ तासांचा आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील ३६ तासांचा मेगाब्लॉक आज संपला. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वेळेआधीच ही दोन्ही कामे पूर्ण झाली. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज ११. १५ वाजता ठाण्याच्या ५ नंबर फलाटावरून ट्रायल रेल्वे चालवून चाचणी करण्यात आली. ट्रायल लोकलची चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्यात आली. लोकल सेवा सुरु झाल्यानंतर १ वाजून १० मिनीटांनी सीएसएमटी स्थानकावरून पहिली लोकल टिटवाळ्यासाठी रवाना झाली तर दुपारी २ वाजता ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वरून पहिली लोकल कर्जतसाठी रवाना झाली.
सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणासाठी आणि ठाणे येथील फलाट क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला होता. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला होता.तर शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या कालावाधीत ९३० लोकल फेऱ्या आणि अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. आजदेखील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. ठाणे स्थानकावरून आज सकाळी जलद लोकलची सूचना दिल्यानंतर धीम्या लोकल फलाटावर दाखल झाल्या. तर अनेक लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र आता ठाणे आणि सीएसएमटी या दोन्ही स्थानकांवरील फलाटांचे काम पूर्ण झाले आहे. फलाटांवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी अतिरिक्त जागा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे ३ दिवसांपासून सुरु असलेला जम्बो मेगाब्लॉक आता संपला असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.