ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र धिक्कार करुन निषेध करण्यात आला.विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये देऊन मते विकत घेतली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी आज सायंकाळी संजय राऊत यांना प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन आयोजित केले होते. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.