धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी

0

मुंबई- सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे, असे आव्हानच भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मराठा समाज आपल्यामागे ऐकेल, बोलेल. तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे, फायद्याचे बोला. तुमची आताची जी भाषा आहे ती कोणाची आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे. इम्तियाज जलील सोबत तुम्ही बैठका घेताहेत. ते छत्रपतींच्या मावळ्यांना आवडेल का? भाजपाचे उमेदवार बघून टार्गेट करण्याचे नियोजन, खेळी न समजण्याइतका महाराष्ट्र दूधखुळा राहिलेला नाही. जरांगे पाटील यांच्यात धमक असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे. परंतु आपला कुणीतरी वापर करतोय, खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी राजकीय पोळी भाजतेय त्याला जरांगे बळी पडताय हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेय. जरांगेंनी राजकीय कपडे बाजूला काढून मराठा समाजाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले तर मराठा समाजाला आंदोलनात आपल्या मागे राहिल्याचे समाधान होईल. नाहीतर ज्या दिवशी तुम्ही पाडापाडीची, शरद पवार, महाविकास आघाडीला मदत करण्याची भुमिका असेल त्यादिवशी मराठा समाजाचा भ्रमनिरास झालेला असेल.

दरेकर पुढे म्हणाले की, फडणवीसांच्या नावाची कावीळ जरांगेंना नव्हती. कुणाच्या तरी सांगण्यावरुन ती झालेली दिसतेय, ती निवडणुकीत बाहेर येईलच. फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा सरकारशी बोलले पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही एकट्यालाच का टार्गेट करता. ज्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, सुप्रीम कोर्टात फेटाळले गेले नाही, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून एक लाख बेरोजगारांना सहाय्य करून उद्योगधंद्यात उभे केले, मराठा समाजाला जी मदत केली ती तरुण-तरुणींना माहित आहे. हा सगळा लेखाजोखा पाहिला तर फडणवीस खऱ्या अर्थाने एक तारणहार म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यांनाच तुम्ही टार्गेट करताय. तुमची राजकीय खेळी जनतेच्या लक्षात आलीय, असा टोलाही दरेकरांनी जरांगेंना लगावला.

दरेकर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील एक नव्हे तर चार पाच नेते मुख्यमंत्री पदासाठी गूढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना वागायचे वेगळेच असते. त्यांच्या मनात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा असू शकते. परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून संदेश देण्यासाठी त्यांनी आजचे वक्तव्य केले असावे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची एवढी ओढ लागलीय की त्यांनी दिल्लीलाही लोटांगण घातले. परंतु हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पुन्हा उचल खाल्ली. राऊत बोलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तीच री ओढण्याचे काम अनिल परब करताहेत. त्यांच्या मनातील सुप्त इच्छा आता लपून राहिलेली नाही. काँग्रेसचेही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बाशिंग बांधून आहेत. अभेदय असलेल्या महायुतीच्या मागेच राज्यातील जनता उभी राहील. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, असा ठाम विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

श्याम मानव यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, श्याम मानव यांनी मानवी दृष्टिकोन घेतला अभिनंदन करतो. श्याम, काळोख, संध्याकाळ हे माझ्या बहिणींच्या नशिबी येण्यापेक्षा प्रकाश टाकण्याचे काम राज्य सरकार करते त्यावेळी श्याम मानव यांच्या दृष्टिकोनाचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना वेगळा आधार, आत्मविश्वास निर्माण झालाय. महाविकास आघाडीची नियत लाडक्या बहिणींच्या विरोधात आहे. काँग्रेसचेच काही लोकं ही योजना बंद करावी म्हणून कोर्टात गेले. लाडक्या बहिणींची योजना चालूच राहील. आणखी ताकदीने पुढे नेऊ. विरोधकांनी कितीही टीका, अडथळे आणले तरी लाडक्या बहिणी पुन्हा महायुतीला सरकार बनविण्यासाठी संधी देणार असल्याचा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech