गडचिरोली : जहाल महिला माओवादी नेता तारक्काने आज गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे. पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का १९८३ मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे. तारक्का सध्या माओवाद्याच्या दडकरण्या झोनल समितीची सदस्य आहे. तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम आहे. तिच्यावर १७० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत दाखल करण्यात तारक्काने सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
गडचिरोलीमध्ये पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत, या भागातला माओवाद्यांचा प्रभाव आपण संपवला आहे. आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांच कंबरडे तोडण्याचे काम झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते गडचिरोली दौऱ्यावर होते. देवेंद्र फडणवीसांसमोर आठ पुरूष आणि तीन महिलाांनी आत्मसमर्पण केले. जहाल नक्षलवादी तारक्कांनी देखील त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हे सगळ्या पोलीस दलाचे यश आहे. जी काही मदत राज्य सरकार करत राहील, राज्याचा गृह विभाग उभा राहील. २०२५ चा हा सूर्य उगवला आहे तो असाच राहिला पाहिजे. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचे योग्य काळजी घेतली जाईल असेही, यावेळी मुख्यमंत्री यांनी बोलतांना सांगितले.