विशेष
भाजप चे दिवंगत नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशातील नेते वन आणि पर्यावरणमंत्री दिलीपसिंग जुदेव होते. राजकारणात पैश्याच्या वापराबद्दल त्यांचे एक प्रसिध्द वक्तव्य आजही चर्चेत असते. ते म्हणाले होते की, ‘पैसा खुदा तो नहीं, पर खुदा की कसम, खुदा से कम भी नहीं’… स्व. दिलीप सिंह जूदेव यांच्या या वक्तव्याची आठवण आज का होत आहे? तर ते ज्या पक्षाचे नेते होते त्याच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना नालासोपारा येथे एका हॉटेलमध्ये स्थानिक बविआ उमेदवार क्षीतीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे देताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे आणि लाखो रूपये त्यांच्याकडे असल्याचे आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणूकीच्या आदल्या दिवशीच प्रचंड मोठा भूकंप राजकीय वर्तुळात त्यामुळे झाला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी एरवी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या भाजपचे निवडणूक स्पेशलिस्ट स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क येथील १४ नोव्हेंबरच्या रँलीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात झाली. त्यानंतर अचानक मोदी यांनी प्रचाराची सांगता होण्याच्या चार दिवस आधीच निवडणूकांचे मैदान सोडले आणि ते नायजेरीया, ब्राझीलच्या दौ-यावर निघून गेले. त्यानंतर गृहमंत्री अमीत शहा यांच्या विदर्भात सभांचे कार्यक्रम सुरू होते. त्यासाठी नागपूरात आलेल्या शहा यांनी देखील सभा रद्द करत अचानक दिल्लीकडे धाव घेतली आणि मणीपूरच्या हिंसक घटना आणि तेथील राज्य सरकारमधील बंडखोरीच्या कारणाने ते महाराष्ट्रात वेळ देवू शकत नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेतल्याचे पहायला मिळत होते. त्यानुसार तावडे यांनी राहूल गांधी यांच्या अदानी यांच्या विरोधात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेला आवेशपूर्ण भाषेत राहूल गांधी फेक आहेत असे उत्तर देखील दिले होते. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आणि भाजपचा नवा चेहरा मुख्यमंत्री होणार अश्या प्रकारची वक्तव्ये त्यांनी केल्याचे समूह माध्यमे आणि राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते.
मात्र त्यापूर्वी आदल्याच दिवशी नागपूरात माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक विधान परिषद परिणय फुके यांचा सहभाग असल्याचा थेट आरोप देशमुख यांचे सूपूत्र आणि काटोलचे राष्ट्रवादी शप चे उमेदवार सलील देशमुख यानी केला होता. या हल्ल्यानंतर आणि त्यांच्यावरील आरोपानंतर देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर समोर येवून कोणतेही विधान केले नाही. खरेतर गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात या घटना घडतात, दोन दिवसांनी मतदान असते आणि तरी देखील फडणवीस यावर चुप्पी साधतात? मात्र त्यांचे समर्थक मात्र देशमुख यांचा हल्ला हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप करत राहतात. अश्या घडामोडी महाराष्ट्रात निवडणूकांच्या वेळेस प्रथमच घडल्या आहेत.
त्यानंतर दुस-याच दिवशी भाजपचे आणखी एक नेते राजकीय संकटात सापडतात आणि त्यांच्या विरोधात पैसे वाटल्याचा आणि आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवला जातो, ही गोष्ट भारतीय जनता पक्षासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या विरोधात निवडणूकीच्या मैदानात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या दोन्ही घटनांवर तातडीने चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली. तर तावडे यांच्यासारख्या नेत्यांला राजकीय सापळ्यात कुणीतरी भाजपच्या बड्या नेत्यांनेच अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे देखील संजय राऊत यांनी संकेत दिले. बविआचे नेते क्षीतीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यानी देखील भाजपच्या स्थानिक नेत्यानेच तावडे पैसे घेवून आल्याचे कळविले असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने या बाबत महाराष्ट्र भाजपमध्ये नंबर वन होण्यासाठी आपसात गटबाजी होत असल्याचे संकेत मिळाल्याचे जाणाकारांच्या चर्चेत बोलले जावू लागले आहे.
भाजपचे तिसरे महत्वाचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील अश्या प्रकारे राजकीय अडचण त्यावेळी झाली होती, ज्यावेळी महिनाभरापूर्वीच त्यांच्या मुलाकडून मद्यधुंद स्थितीत गाडी चालवून अनेकांना जखमी केल्याची घटना झाली होती. तर ऐन निवडणूंकाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे मराठवाड्यातील आणखी एक नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्नड विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेकडून उमदेवार असलेल्या कन्या संजना जाधव यांनी त्यांचे माजी पती हर्षवर्धन जाधव यांच्याकडून अन्याय केल्याचा आरोप करणारी वक्तव्ये भरसभेत केल्यानंतर जाधव यांच्या दुस-या पत्नीने देखील संजना यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्यावर प्रत्युत्तरादाखल आरोप केले आहेत. भाजपचे एका काळातील उत्तुंग नेते आणि भावी पंतप्रधान समजले जाणारे स्व. प्रमोद महाजन यांच्या कन्या माजी खासदार पूनम महाजन यानी देखील अलिकडेच सुमारे अठरावर्षांनंतर माध्यमांसमोर येत आपल्या वडिलांच्या हत्येमागे षडयंत्र असल्याबाबत वाच्यता केली आहे. त्यानंतर यावर नेमके निवडणूकांच्या काळात हे वक्तव्य का केले जात आहे अशी राजकीय वर्तुळ आणि माध्यमातून चर्चा सुरू आहे.
त्या शिवाय बटेंगे-कटेंगे या घोषणेवर देखील भाजपचे सहयोगीपक्ष राष्ट्रवादी अजीत पवार कडून अश्या प्रचाराला विरोध असल्याचे जाहीर वक्तव्य करण्यात आले आणि गंमत म्हणजे त्याला पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील या अन्य नेत्यांकडून समर्थन देखील मिळाल्याने नंतर ही घोषणा बदलून ‘एक है तो सेफ है’ अशी करण्यात आली होती. मात्र ‘भाजपमध्ये कोणी एक नाही की सध्या कुणीच सेफ’ नसल्याचे या विवेचनातून स्पष्ट झाले आहे. महायुतीचे सरकार राज्यात येणार असल्याच्या घोषणा आणि अपेक्षा असताना पक्षात सुरू असलेल्या सुंदोपसुंदी बाबत गोदी मिडिया मात्र मौन बाळगून आहे.
कारण मोठ्या प्रमाणात भाजपच्या निवडणूक प्रचार यंत्रणेवर गुजरातच्या नेत्यांचा प्रभाव आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे की, मोठ्या प्रमाणात गुजरातमधून कंटेनर भरून सामुग्री निवडणूकीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. अगदी निवडणूकांसाठी जो जाहिरातींचा बेतहाशा रतिब घातला जात आहे त्यासाठी गुजरातमधल्या पूर्णिमा नावाच्या कंपनीला काम देण्यात आल्याचे आणि त्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाल्याचे माध्यम आणि जाहिरात क्षेत्रात चर्चिले जात आहे. जाणकाराच्या चर्चेनुसार ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, नागपूर, बुलडाणा अश्या महत्वाच्या शहरात या यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून पैश्या पासून प्रचार साहित्या पर्यंत आणि मनुष्यबळा पर्यंतची शक्ती देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये रा स्व संघाच्या कार्यकर्त्यांकडून मोट्या प्रमाणात मदत केली जात असून कोणत्याही स्थितीत महाराष्ट्र विधानसभा हातून जावू द्यायची नाही असा चंग भाजपने बांधला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यामागे मोठी तयारी करून देखील अपेक्षीत प्रभाव किंवा परिणाम येत नसल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रचार संपण्यापूर्वीच दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा असे आता बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, ज्या अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्यांच्यावर त्यापूर्वीच्या तीन चार वर्षात इडीसह केंद्रीय यंत्रणांकडून छापे घालून प्रचंड दबाव आणायचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्यांना शंभर कोटी वसुलीचे आरोप प्रकरणी अठरा महिने तुरूंगात जावे लागले आणि आता ते जामिनावर आले असताना त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करणा-या न्या चांदिवाल यांच्या आयोगाचे मुख्य निवृत्त न्यायाधिश महेश चांदिबाल हे वृत्तवाहिनीला मुलाखत देवून देशमुख यांना क्लिनचीट दिली नसल्याचा खुलासा करताना दिसतात. एखाद्या माजी न्यायाधिशाला जो एखाद्या चौकशी अहवालाचा अंतिम निष्कर्ष सरकारला सादर करतो त्यानंतर त्यावर भाष्य करता येते का? सरकारने जो अहवाल अजूनही गोपनीय ठेवला असताना त्यात काय निष्कर्ष दिले आहेत याची चर्चा चांदिवाल माध्यमांत करतात आणि देशमुख यांची पु्न्हा सीबीआयकडून चौकशीची मागणी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अँड आशिष शेलार करताना दिसतात? हा घटनाक्रम देखील या हल्ल्यापूर्वी घडला आहे.
तीच गोष्ट ज्या बविआ च्या ठाकूर पिता-पूत्रांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे, त्यांच्या निवडणूक चिन्ह शिट्टी बाबत निवडणूकीचा प्रचार संपायला काही दिवस बाकी असे पर्यत आयोगाकडून आक्षेप घेण्यात आले, त्यांना हे चिन्ह देता येणार किंवा नाही यावर संभ्रम निर्माण करण्यात आला, मात्र अन्य कोणत्याही चिन्हावर बविआ ठामपणे लढण्याच्या भुमिकेत आल्याचे दिसले त्यांनंतर, त्यांच्या डहाणू येथील उमेदवाराला फोडून मतदानाच्या आदल्याच दिवशी भाजपात प्रवेश देण्यात आला होता, असे दबाव तंत्राचे साम दाम दंड भेद राजकारण महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू असल्याचे दिसत असताना २० तारखेला मतदान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणीच एक आणि सेफ नसल्याचे बोलले जात आहे. त्यातून भाजपमध्ये अंतर्कलह मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे का? अश्या चर्चा समोर येत आहेत. तूर्तास इतकेच!
किशोर आपटे
( लेखक व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)
९८६९३९७२५५