बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मोठी कामगिरी बजावली आहे. इस्त्रोला अंतराळात चवळी अंकुरीत करण्यात यश मिळाले आहे. इस्त्रोने 30 डिसेंबर रोजी ही मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात अंतराळात जीवन अंकुरीत करण्यात यश मिळाले आहे. इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी श्रीहरिकोटा येथून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत पीएसएलव्ही-सी-60 रॉकेटच्या साह्याने पृथ्वीपासून 470 किमी वर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले. पीओईएम-4 (पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल) वर क्रॉप्स (कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज) सोबत पाठवलेल्या अंतराळात प्रथमच जीवन अंकुरित करण्यात यश आले आहे.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे तयार केलेल्या सीआरओपीएसने चवळीच्या बिया फक्त 4 दिवसात अंकुरीत केल्या असून त्याला लवकरच पाने येण्याची अपेक्षा आहे. चवळी लवकर उगवत असल्याने इस्त्रोने प्रयोगासाठी चवळीच्या बियाण्याची निवड केली होती. तसेच चवळी पौष्टिक वनस्पती असल्याने इस्त्रोचा हा प्रयोग अंतराळात अन्न वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे, जे भविष्यात चंद्र, मंगळ किंवा इतर ग्रहांवर मानवी उपस्थिती टिकवून ठेवण्यास मदत करेल. चेझर मॉड्यूलने अंतराळात इन-ऑर्बिट स्पेस सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. अंतराळात अचूक डॉकिंगची पडताळणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे आणि मिशन योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा पुरावा हा व्हिडिओ देतो. लक्ष्याच्या दिशेने जात असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. गेल्या 2 जानेवारी रोजी त्याचे आंतर-उपग्रह अंतर 4.8 किमी होते. दोन्ही स्पेसक्राफ्टच्या डॉकिंगचा रिअल टाइम व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला जाईल.
संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोड देखील स्पेस-एक्स सोबत पाठवण्यात आले. हे पेलोड पृथ्वीपासून 700 किलोमीटर उंचीवर डॉक केलेले आहेत. यापैकी 14 पेलोड्स इस्रोचे आहेत आणि उर्वरित 10 स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांचे आहेत. यापैकी एक प्लान्ट एक्सपेरिमेंटल मॉड्यूल इन स्पेस हे पेलोड ऍमिटी विद्यापीठाने तयार केला आहे. अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचे संशोधन केले जाईल.या संशोधनांतर्गत अवकाशात आणि पृथ्वीवर एकाच वेळी प्रयोग केले जाणार आहेत. पालकांच्या पेशींना सूर्यप्रकाश आणि पोषक तत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी एलईडी लाईट्स आणि जेलच्या माध्यमातून पुरवल्या जातील. कॅमेरा वनस्पती पेशींचा रंग आणि वाढ रेकॉर्ड करेल. जर सेलचा रंग बदलला तर प्रयोग अयशस्वी होईल.