पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची गुरुवारी वाकड येथील कार्यालयात भेट घेतली.यावेळी जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
वसंत मोरे यांनी जाधव यांच्यासमवेत आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली . यावेळी दोन्ही नेत्यांमधील सूर जुळल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांचा हास्यविनोद आणि वसंत मोरे यांचा खुललेला चेहरा बरेच काही सांगून जात होता.
दरम्यान, वसंत मोरे हे काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छक होते. मात्र, याठिकाणी आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने मोरेंच्या मनसुब्यांवर पाणी पडले.
मात्र, त्यानंतरही त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर अनिल जाधव यांनी त्यांना वंचितकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल जाधव व वसंत मोरे यांनी आज मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.