मुंबई : भारतीय नौदल ९ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे आयएनएस तुशील ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी सज्ज आहे. आयएनएस तुशील ही प्रोजेक्ट 1135.6 ची क्रिवाक III श्रेणीची अपग्रेड केलेली युद्धनौका आहे. आयएनएस तुशील युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉनएक्स्पोर्ट , भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या अधिपत्याखाली कॅलिनिनग्राड येथे तैनात असलेल्या युद्धनौका पर्यवेक्षण पथकातील तज्ज्ञांच्या भारतीय पथकाने जहाजाच्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले. या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
नौदलात समाविष्ट झाल्यावर, आयएनएस तुशील भारतीय नौदलाच्या ‘स्वोर्ड आर्म’ या पश्चिमी नौदल कमांडच्या अंतर्गत, वेस्टर्न फ्लीट मध्ये सामील होईल,आणि जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौकेपैकी एक गणले जाईल. हे केवळ भारतीय नौदलाच्या वाढत्या क्षमतेचेच नव्हे तर भारत-रशिया भागीदारीच्या लवचिक सहकार्यात्मक सामर्थ्याचे प्रतीक असेल. ही युद्धनौका अनेक रशियन आणि भारतीय मूळ उपकरण निर्मात्यांबरोबरच शेकडो शिपयार्ड कामगारांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा परिणाम आहे. जहाज बांधणी पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या जानेवारीपासून या युद्धनौकेच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्या, ज्यामध्ये फॅक्टरी सी ट्रायल, स्टेट कमिटी ट्रायल,आणि शेवटी भारतीय तज्ज्ञांच्या टीमद्वारे डिलिव्हरी ऍक्सेप्टन्स ट्रायल यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये शस्त्रास्त्रांच्या गोळीबारासह जहाजावरील सर्व रशियन उपकरणे सिद्ध करणे समाविष्ट होते. चाचण्यांदरम्यान, जहाजाने 30 नॉट्सपेक्षा अधिक प्रभावी वेग पकडला. या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे, जवळपास युद्धासाठी सज्ज असून लवकरच भारतात पोहोचेल.
यामध्ये 125 मीटर लांबीचे 3900 टन वजनाचे जहाज रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण उपलब्ध आहे. जहाजाच्या नवीन डिझाईनमध्ये वर्धित स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि उत्तम स्थिरता वैशिष्ट्ये आहेत. भारतीय नौदल विशेषज्ञ आणि सेव्हर्नॉय डिझाईन ब्युरो यांच्या सहकार्याने, जहाजातील स्वदेशी घटकांचे प्रमाण 26% पर्यंत वाढविण्यात आलेले आहे. मेड-इन-इंडिया सिस्टीमची संख्या दुपटीने वाढून 33 इतके झाले आहे. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, केल्ट्रॉन, टाटाचे नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम्स, एल्कॉम मरीन, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया आणि इतर अनेक प्रमुख भारतीय ओईएम यांचा यात समावेश होता. जहाजाचे नाव, तुशील, याचा अर्थ ‘संरक्षक कवच’ आणि त्याचे बोधचिन्ह ‘अभेद्य कवचम’ (अभेद्य ढाल) चे प्रतीक आहे. ‘निर्भय, अभेद्य आणि बलशील’ (निर्भय, अदम्य, दृढनिश्चय) या आपल्या ब्रीदवाक्यासोबत हे जहाज देशाच्या सागरी सीमांचे रक्षण आणि सुरक्षा करण्याच्या भारतीय नौदलाच्या अखंड वचनबद्धतेचे प्रतीक आहे.