पणजी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी समुद्रात भारतीय नौदलाच्या परिचालनाचे निरीक्षण केले. राष्ट्रपती आयएनएस हंसा (गोव्यातील नौदल विमानतळ) येथे उपस्थित होत्या. आयएनएस हंसा येथे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाइस अॅडमिरल संजय जे. सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाप्रीत्यर्थ 150 जवानांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ संचलन केले. यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय नौदलाचे स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतचा दौरा केला. हे जहाज 15 फ्रंटलाइन युद्धनौका व पाणबुड्यांसह कार्यरत होते. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समुद्रामध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांवरील पहिला दौरा होता. राष्ट्रपतींना भारतीय नौदलाचे कार्य, सनद आणि विविध परिचालन याबाबतची माहिती देण्यात आली.
त्यानंतर राष्ट्रपतींनी डेक-आधारित लढाऊ विमानांचे उड्डाण व लँडिंग, युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र प्रक्षेपण सराव, पाणबुडी परिचालन, 30 हून अधिक विमानांचे फ्लायपास्ट आणि युद्धनौकांची पारंपरिक ‘स्टीम-पास्ट’ परेड, इत्यादींसह नौदलाचे परिचालन पाहिले. यानंतर राष्ट्रपतींनी भोजनाच्या वेळी आयएनएस विक्रांतवरील अधिकारी इतर चालक दलाशी संवाद साधला; आणि त्यानंतर या ताफ्याला संबोधित केले, ज्याचे प्रसारण समुद्रातील सर्व नौदल युनिटस मध्ये करण्यात आले.