भारतीय तटरक्षक दलाचा मच्छीमारांशी संवाद

0

रत्नागिरी : रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाने किल्ला गावात स्थानिक मच्छिमार समुदायांशी संबंध वाढवण्याच्या उद्देशाने विशेष समुदाय संवाद कार्यक्रमाचे आयोजित केला होता. हा कार्यक्रम भारतीय तटरक्षक दलाच्या मासेमारी समुदायामध्ये समुद्रात वावरताना सुरक्षितता, सुरक्षा आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला. किल्ला गावातील भैरव मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी तसेच मिरकरवाडा, रत्नदुर्ग आणि भगवती बंदर येथील मच्छिमार संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सुमारे १५० मच्छिमारांचा सहभाग होता. असा उपक्रम भारतीय तटरक्षक दलाची सुरक्षित व समृद्ध सागरी पर्यावरण अबाधित राखण्यासाठी मच्छिमार समुदायासोबतची भागीदारी अधिक बळकट करतो. भारतीय तटरक्षक दलाद्वारे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर प्राधिकरणांच्या मदतीने नियमितपणे अशा प्रकारच्या समुदाय संवाद उपक्रमांची योजना करते.

किल्ला येथील कार्यक्रमात समुद्रामध्ये वावरताना उपयोगात येणारी जीवन रक्षक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, सागरी सुरक्षा आणि प्रदूषण प्रतिबंध आणि देशाच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण आणि मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची भूमिका याविषयी जागरूकता सत्र यांचा समावेश होता. आजच्या जगात भारताला भेडसावणारे सुरक्षा धोके, सागरी नियम व शाश्वत मासेमारी पद्धती, समुद्रातील जीवसृष्टीची सुरक्षा, तटरक्षक दलाचे शोध व बचाव कार्ये आणि खराब हवामानाबाबत इशारे याविषयी उपस्थित मच्छीमार आणि किनारपट्टी भागातील रहिवाशांना माहिती देण्यात आली. समुद्रात असताना तत्काळ आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रथमोपचार ज्ञान, पावसाळ्यातील मासेमारी बंदी, कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापाची तक्रार तटरक्षक दलाला करण्याची पद्धत, एलईडी लाइट वापरून मासेमारी करण्यावर बंदी, पर्स-सीन नेट मासेमारी बंदी, आपत्कालीन कॉलिंग नंबर, डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समिटिंग सिस्टीमचा वापर इत्यादी विषयांचा या सत्रामध्ये समावेश करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक गिरीश चंद्र यांनी कार्यक्रमात सुरक्षित किनारपट्टी सुनिश्चित करण्यासाठी मच्छिमार समुदाय भारतीय तटरक्षक दलाचे डोळे आणि कान असल्याचे सांगून त्यांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात समुदायाच्या समस्या आणि सूचनांचे निराकरण करण्यासाठी संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रदेखील आयोजित केले गेले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech