इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

0

ठाणे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. तसेच ठाण्यात मिंधेची उमेदवारी गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गॅंगवर जोरदार निशाणा साधला.
इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद, कॉंग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार, कॉंग्रेस महिला आघाडी पूनम पाटील, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, अनिश गाढवे, मुजफ्फर हुसैन, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, व इंडिया-महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech