सोलापूर : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा आता काही दिवसांवर असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन परीक्षा केंद्रे वाढली असून जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर त्यांची परीक्षा होईल. तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची तीन केंद्रे वाढली असून जिल्ह्यात बारावीसाठी १२४ केंद्रे असणार आहेत.सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता बारावीचे जवळपास ५८ हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीतील ६३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांची १२४ केंद्रांवर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची १८४ केंद्रांवर परीक्षा होईल. सध्या केंद्र संचालकांची यादी अद्ययावत केली जात आहे. दोन्ही परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे, पण ज्या केंद्राजवळ दुसरे केंद्र नाही, अशा केंद्रांसाठी ही पद्धत लागू नाही. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशानुसार बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी बहुतेक परीक्षा केंद्रांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.