नवी दिल्ली – देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणुकीतील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून पहिल्या चार टप्प्यांपेक्षा पाचव्या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगानं देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात जाहीर केल्या होत्या. यापैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात एक वेगळी गोष्ट घडली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानात महिला मतदारांनी आघाडी घेतली असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचे एकूण मतदान ६७.१८ टक्के झाले, तर पुरुषांचे मतदान ६७.०२ टक्के झाले. तुलनेने महिलांचे मतदान जास्त होते. या वेळी २० मे रोजी पाचव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या टप्प्यात एकूण ६२.२० टक्के मतदान नोंदवले गेले. त्यापैकी पुरुष मतदारांचे मतदान ६१.४८ टक्के झाले, तर महिलांचे मतदान ६३ टक्के झाले.
जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये महिला मतदारांचे मतदान कमी नोंदवले गेले. या टप्प्यात मतदान झालेल्या ४९ मतदारसंघांपैकी २४ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण जास्त होते, त्यापैकी २२ मतदारसंघांमध्ये २०१९ मध्येही हाच कल नोंदवला गेला होता. निवडणूक आयोगाच्या मते पाचव्या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार मतदानास पात्र होते. त्यापैकी ४.९६ कोटी पुरुष, ४.२६ कोटी महिला आणि ५,४०९ तृतीयपंथींचा समावेश होता.
विशेष म्हणजे बिहार, झारखंड या राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याचे दिसून आले. बिहारमध्ये ५३.४२ टक्के पुरुषांचे मतदान झाले, तर ६१.५८ टक्के महिलांनी मतदान केले. झारखंडमध्ये ६८.६५ महिला, तर ५८.०८ पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला. झारखंडमधील कोडरमा मतदारसंघात ५४.१५ पुरुषांनी, तर ७० टक्के महिलांनी मतदान केले. मतदानातील हा फरक १५.४८ टक्के इतका जास्त होता.
जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी महिलांनी मतदान केले, मात्र बिहार, झारखंडमध्ये अधिक महिलांनी मतदान केले, असे निवडणूक आयोगाने सांगितले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे ४८ मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या जागांवरील मतदानाची टक्केवारी पाहिली असता पुरुष मतदारांनी अधिक मतदान केल्याचं एकूण टक्केवारीतून समोर आलं आहे.