त्या व्हिडीओ प्रकरणात पोलीस ॲक्शन मोडमध्ये

0

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. सोमवारी, 29 एप्रिल रोजी पोलिसांनी अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिसांनी रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चौकशीसाठी नोटीस जारी केसी आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांच्या फोनचीही तपासणी केली जाणार आहे. या नोटीसमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांचा फोनही सोबत आणण्यास सांगितलं आहे. रेवंत रेड्डी यांनी अमित शाह यांचा फेक व्हिडीओही त्यांच्या एक्स म्हणजेच आधीच ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. हा व्हिडीओ तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटसह पक्षाच्या अनेक नेत्यांनी शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये केंद्रीय गृहमंत्री कथितरित्या एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. अमित शाह यांनी कर्नाटकातील मुस्लिमांना दिलेले आरक्षण संपवण्याबाबत बोलल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलं आहे.

दिल्ली पोलिसांनी रविवारी अमित शाह यांचा एडिटेड बनावट व्हिडीओ पसरवल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. भाजप आणि गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दावा केला होता की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ पसरवणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 153/153ए/465/469/171जी आणि आयटी कायद्याच्या कलम 66सी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech