ठाणे – तारामाऊली सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन कोपरी परिसरातील ३०० घरेलु कामगार महिलांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभापाठोपाठ घरेलु कामगार कुटुंबांना भांड्याचे संच भेट म्हणून मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी घरेलु कामगारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. हातावर पोट असलेल्या कोपरी परिसरातील सामान्य घरकामगार महिलांना भरत चव्हाण यांच्याकडून नेहमी सहकार्य केले जाते. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ कुटुंबांना मिळवून दिले जातात. त्यानुसार घरेलु कामगारांच्या योजनेतून कोविड आपत्तीच्या काळात कोपरी परिसरातील ३०० हून अधिक घरेलु महिला कामगारांची नोंदणी करण्यात आली होती.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह तारामाऊली सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कोपरीतील घरेलु महिला कामगारांचे अर्ज भरुन घेण्यात आले होते. तसेच या अर्जासाठी कागदपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने दाखले शिबीर भरविण्यात आले होते. नोंदणीकृत घर कामगार भगिनींना महायुती सरकारने ३० भांडी असलेला गृह उपयोगी भांड्याचा सेट भेट म्हणून दिला आहे. कोपरी परिसरात या भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी या भगिनींनी महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, तारामाऊली सेवा संस्थेच्या माध्यमातून नुकतेच कोपरी भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी महिला भगिनींना साडीभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.