मराठवाड्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करा….!

0

नाना पटोले यांची सरकारकडे मागणी

मुंबई – अनंत नलावडे
मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.रस्ते आणि पूल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्कही तुटला आहे.त्यातच पुराच्या पाण्याने शेतातील उभे पीकही वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला.शेकडो जनावरे वाहून गेली.नद्या,नाल्यांना पूर आला असून सरकारने आता इव्हेंटबाजी आणि जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी,अशी आग्रही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सरकारकडे केली.

मागील दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड,परभणी, हिंगोली,बीड,धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली असून घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्याला पुराने वेढले आहे. पूरग्रस्त लोकांना मदतीची नितांत गरज असून राज्य सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.पूरग्रस्तांना सरकारी मदत तातडीने पोहचेल याची व्यवस्था करावी.व जेथे गरज असेल तेथे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा. नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश द्यावेत. पण त्याआधी तातडीची मदत जाहीर करून ती पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था करावी,अशी मागणीही पटोले यांनी केली.

पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची सर्व व्यवस्था करावी.सर्व सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लावून जनतेला आधार देण्यास आणि सर्व प्रकारची मदत पोहोचेल याकडे लक्ष देण्याची गरज असून पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत पोहचवण्यासाठी सरकारने तातडीने आदेश द्यावेत.अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत.फक्तं लाडका उद्योगपती आणि लाडक्या कंत्राटदारासाठी जसे सरकार जलतगतीने काम करते त्यापेक्षा जास्त गतीने पूरग्रस्त आणि शेतक-यांना मदत द्या,असा टोलाही पटोले यांनी लगावला

कापसाला हेक्टरी ५० हजाराची मदत द्या……

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने आता इव्हेंटबाजीमधून वेळ काढून शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली असून शेतीच्या नुकसानीचे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत आणि कापसाला हेक्टरी ५० हजार,सोयाबीनला हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करावी,अशी मागणीही त्यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech