* आमदार अपात्रतेवर २३ जुलै रोजी सुनावणी
मुंबई – शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १४ ऑगस्ट रोजी, तसेच आमदार अपात्रता प्रकरणावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केले. त्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. यावर आता १४ ॲागस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य एक महिन्यानंतर न्यायालयात ठरणार आहे. याबाबत न्यायालयाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. आता सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर येत्या २३ जुलैला सुनावणी होण्याची माहिती मिळत आहे. २३ जुलैला ही सुनावणी झाल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयात पाठवावी, याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे.