छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून, माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील हर्षवर्धन जाधवांनी रिंगणात उतरत तब्बल २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळवले होते. त्यांच्या उमेदवारीमुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांचे नाव घोषित झाले आहे. तर, विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे. तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड देखील उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत आता पुन्हा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे रिंगणात उतरणार आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच, बाळासाहेब आंबेडकर यांनी जर संधी दिली, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरणार असल्याची इच्छा देखील जाधव यांनी व्यक्त केली आहे.